ठाणे : भिवंडी शहरात अनधिकृतपणे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंज सुरुच असल्याचे यापूर्वीही अनेक वेळा पोलिसांनी मारलेल्या छापेमारीवेळी उघडकीस आले असतानाच, पुन्हा एकदा बेकादेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने धाड टाकून पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून ऑपरेटरला अटक केली आहे. तबरेज सोहराब मोमीन (वय 34 रा. कारीवली, भिवंडी) असे अटक केलेल्या बोगस टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
टेलिफोन एक्सचेंज धाड : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील सुभाष नगर, नालापार, येथील मतीन शेख चाळीत बेकादेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याची माहिती मुंबई दहशतवाद विरोधी पथकाच्या ठाणे युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १५ फ्रेबुवारी रोजी दुपारच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाने या बेकायदा आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज धाड टाकली होती. त्यावेळी भिवंडी तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत परिसरात राहणारा तबरेज सोहराब मोमीन हा एजंट म्हणून काम करत असताना बेकायदा आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचे समोर आले.
भारत सरकारची फसवणूक : विशेष म्हणजे सार्वजनिक टेलिफोन नेटवर्कद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात अडचणी येत असल्याने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु आरोपी तबरेज सोहराब मोमीन याने कोणतीही परवानगी न घेता आपल्या जवळच्या एजंटांमार्फत भारतातील हव्या त्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल्स अनाधिकृतपणे वळवून भारत सरकारची फसवणूक केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात समोर आले. बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा हा प्रकार स्थानिक मोबाईल नेटवर्क सेवा कंपन्या आणि भारत सरकारचे आर्थिक नुकसान करून देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक असल्याने आरोपीकडील बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविण्यासाठी लागणारे ७० हजार ५०० रुपयांचे विविध उपकरणे जप्त केली आहे.
आरोपी तबरेज सोहराब मोमीनला अटक : तसेच ठाणे दहशतवाद विरोधी पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी आजले (वय ३४) यांच्या तक्रारीवरून १६ फेब्रुवारी रोजी भोईरवाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, भारतीय वायरलेस मशिनरी कायदा १९३३ च्या ३, ६ आणि भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम ४, २० आणि २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे आधारे आरोपी तबरेज सोहराब मोमीन अटक करून न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एम. घुगे करीत आहेत.
गेल्याच वर्षी जानेवारी २०२२ सालीही मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा ठाण्यातील चितलसर मानपाडा पोलीस पथक करत असतानाच भिवंडीत अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालविणारे गळाला लागले होते. चितलसर मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस भिवंडी येथील एका मोबाईल रिपेयर दुकानावर गेले होते. त्यावरून पोलिसांनी शोएब अन्सारी आणि मोमीन नामक या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती.
हेही वाचा - MP Amol Kolhe : शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकावा याकरता भगवा जाणीव आंदोलन छेडणार - खासदार डॉ.अमोल कोल्हे.