नवी मुंबई - राज्य सरकारने बुधवारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे आदेश काढून नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती केली होती. मात्र, बुधवारी रात्री या बदली आदेशाला सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी अण्णासाहेब मिसाळ कायम राहणार आहेत.
नवी मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आकडेवारी आणि राजकारणाचे बळी ठरवत मिसाळ यांची बदली करण्यात आली होती. कोरोनाच्या मार्च ते आजपर्यंतच्या काळात केलेल्या कामाचा लेखाजोख मांडत आपण कुठेही कमी पडलो नसल्याचे मिसाळ यांनी स्पष्टीकरण दिले. प्रत्येक विभागात सुरू असलेले मास्क स्क्रिनिंग, नव्याने सुरू केलेले वाशी एक्झिबिशन सेंटर येथील १,२०० खाटांचे अद्ययावत कोव्हिड रूग्णालय, पावसाळी कामे, यांच्यासह इतर सर्व कामांचा अहवाल समोर ठेवण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य विभाग यांच्या आदेशाने सर्व कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे बदलीला स्थगिती मिळावी, अशी विनंती आयुक्त मिसाळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती मिळाली. बुधवारी रात्री उशीरापर्यंत मिसाळ मंत्रालयात होते. रात्रीच मुख्यमंत्री कार्यालयातून स्थगिती दिल्याची माहिती मिळाली. गुरूवारी पुन्हा एकदा मिसाळ यांनी महापालिका आयुक्त दालनात हजर होऊन त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली. याबाबत मिसाळ यांना विचारले असता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या बदली संदर्भात स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
नवे आयुक्त अभिजीत बांगर गुरूवारी सकाळी महापालिकेत पदभार घेणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर विभाग अधिकारी यांची बैठक होणार असल्याने सर्व अधिकाऱ्यांना सकाळी साडेनऊ वाजता महापालिका मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश बुधवारी काढण्यात आले होते. मात्र, गुरूवारी सकाळी मिसाळांनी पदभार घेतल्याने त्यांच्या बदली आदेशाला स्थगिती मिळाल्याचे स्पष्ट झाले.