ठाणे - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत माझ्यावर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी घोडबंदर रोड येथील नागरिक अनंत करमुसे यांनी भाजपाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही केली आहे.
राज्यात लॉकडाऊन सुरू असताना ५ एप्रिलला मला घोडबंदर रोड येथील माझ्या घरातून नेण्यात आले. त्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलीस सुरक्षा रक्षक व गुंडांचा सहभाग होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात आव्हाडांसमोर मला बेदम मारहाण करून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.
सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना, मंत्री आव्हाड यांच्याकडून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मारहाण झालेले नागरिक अनंत करमुसे यांनी केली आहे.
खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची ठाण्यात आज भेट घेऊन करमुसे यांनी निवेदन दिले. तसेच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. या वेळी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, सुजय पत्की, अॅड. अनिरुद्ध गानू यांची उपस्थिती होती.