ठाणे - राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाला फडणवीस सरकार जबाबदार आहे, त्यांनी याबाबत गंभीरपणे उपाययोजना केली असती तर दुष्काळाची एवढी दाहकता जाणवली नसती, मराठा आरक्षण व राज्यातील अभूतपूर्व दुष्काळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर तोफ डागली.
मराठा आरक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले, हा न्यायालयीन विषय असून राज्य सरकार कमी पडले नसते तर आरक्षणाचा मुद्दा रेंगाळला नसता, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्रशिल्पाच्या अनावरण प्रसंगी खासदार कोल्हे हे ठाण्यात आले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यासह फुले, शाहू, आंबेडकर या राष्ट्रपुरुषांची अप्रतिम चित्रशिल्पे कळवा रेतीबंदर येथे साकारण्यात आले असून पुरोगामी महाराष्ट्राचे दर्शन घडवणारे हे चित्रशिल्प उभारल्याबद्दल त्यांनी जितेंद्र आव्हाडांचे तोंडभरून कौतुक केले.