ठाणे : अंबरनाथ पालिकेच्या कर विभागातील कर निरीक्षकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून आज सायंकाळच्या सुमारास रंगेहात अटक केली आहे. देवसिंग पाटील (वय ५४) असे या लाचखोराचे नाव असून त्याच्याकडून ५ हजार ६०० रुपयांची घेतलेली लाच पथकाने हस्तगत केली आहे. या घटनेमुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पाच दिवसापूर्वीही रचला होता सापळा ..
लाचखोर देवसिंग पाटील हा अंबरनाथ पालिकेमध्ये लिपिक असून, त्यांच्याकडे कर विभागाच्या निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. अंबरनाथ पश्चिमेतील एका टॅक्सच्या प्रकरणात त्याने तक्रारदारकडून लाचेची मागितली केली होती. तडजोडीअंती ५ हजार ६०० रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केल्यानंतर पाच दिवसांपूर्वी पाटील यांच्यावर सापळा रचण्यात आला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. अखेर आज पुन्हा एकदा सापळा रचल्यानंतर लाचखोर पाटील जाळ्यात रंगेहात अडकला.
लाचेची रक्कम फेकून दिली..
आपल्यावर सापळा लागल्याचं लक्षात येताच देवसिंग पाटील याने लाचेची रक्कम फेकून दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत केली. याप्रकरणी लाचखोर पाटील याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, अधिक तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.