ठाणे - कोरोनाचा फैलाव पुन्हा झपाट्याने जिल्ह्यात वाढायला लागला आहे. दिवसागणिक जिल्ह्यात ७ ते ८ हजार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच भिवंडी शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया आणि भारतीय स्टेट बँकमधील बँक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे फलक लावून बँकेला टाळे लावण्याची वेळ बँक प्रशासनावर आली आहे.
शाखा व्यवस्थापकांसह कर्मचारी कोरोना बाधित..
भिवंडी शहरातील मंडई परिसरात असलेल्या इमारतीमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया शाखा आहे. या बँकेत शाखा व्यवस्थापक अमरदीप यासोबत एकूण पाच कर्मचारी कर्तव्यावर असून शुक्रवारी हे सर्व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र कोरोनाची लागण ग्राहकांमध्ये पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून बँकेबाहेर नोटीस (फलक ) लावून बँकेला टाळे ठोकले आहे. तर भिवंडीतील जकात नाका येथील भारतीय स्टेट बँके बाहेर नोटीस (फलक ) लावून बँकेला टाळे ठोकले आहे. विशेष म्हणजे आज शनिवार व उद्या रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी नियमित वेळेत बँक दुसऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून सुरू राहील, असे दोन्ही बँक प्रशासनाने कळविले आहे.
कोरोना मुक्त शहर म्हणून गणना; मात्र..
भिवंडी शहरात लाखोंच्या संख्येने कामगारवर्ग विविध भागात राहतो. विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना मुक्त शहर म्हणून सर्वात आदी भिवंडी शहराची गणना झाली होती. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, अचानक शहरात पुन्हा रुग्ण संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात १०१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ३७९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर आज दिवसभरात ३ रुग्ण बरे झाले आहे. ओमायक्रोनचेही ४ रुग्ण आढळून आले होते.