ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावानंतर महापालिका, पोलीस यंत्रणेने दुकानदारासह किरकोळ विक्रेत्यांवर कोरोना नियमाचे कठोर निर्बंध 11 मार्चपासून लादले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर बार, रेस्टॉरंट, हॉटेल यांना रात्री 11 वाजेपर्यंत मुभा दिली. मात्र, याच मुभेचा गैरफायदा या मंडळींकडून सुरू असून ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरू असलेला छमछमचा धांगडधिंगा रात्री 11 वाजेल्यानंतरही सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने पोलीस व पालिका प्रशासनाने लादलेल्या कोरोना नियमाला या ऑर्केस्टा बारवाल्यांनी पायदळी तुडवल्याची चर्चा सर्वसामान्य दुकानदार करताना दिसत आहे.
उशीरापर्यंत छमछम सुरू, मग कसा रोखणार कोरोना
कल्याण-शीळ मार्गावर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान 25 ऑर्केस्टा बार असतील, या बारमध्ये उशीरापर्यंत बारबालांची छमछम सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांनी टाकलेल्या धाडी दरम्यान उघडकीस आले आहे. अशा कोरोनाच्या काळात ही डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शीळ मार्गावरील एका ऑर्केस्टाबारमधील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले असून रात्री 12 वाजेनंतरही हा छमछम बार सुरू असल्याचे दिसून येत आहे. केवळ हा बार नाही तर, या मार्गावरील इतर बार रेस्टॉरंट देखील बिनदिक्कत सुरू असून कोरोनाचे निर्बंध केवळ सर्वसामान्य दुकानदारांनाच का, असा सवाल या व्हिडिओमूळे उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने बार सुरू ठेवण्याचे आदेश असताना देखील या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ग्राहक व बारबालांनी कोणीही मास्क घातलेले नाही तर कुठली सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत कोरोनाला आळा बसेल की, आणखी कोरोनाचा प्रादुभाव वाढेल, असा सवालही कोरोनाच्या निर्बंधात अडकलेल्या व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - मित्रानेच केली महागड्या विदेशी पक्ष्यांची चोरी
हेही वाचा - कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, उद्यापासून कठोर निर्बंध लागू