ठाणे - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आलेले वैद्यकीय मदत कक्ष नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या 'श्रीकांत शिंदे फाऊंडेशन मार्फत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवसेना या वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे या मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या मदत कक्षाद्वारे संपुर्ण महाराष्ट्रभर सेवा केली जात आहे.
गरजू रूग्ण आणि रुग्णालयामध्ये दुवा साधण्याचे काम
कोरोनाच संकट, पूरग्रस्त केरळ, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून, वैद्यकीय पथक मदतकार्य करत आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गरजू रुग्णांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. संबंधित गरजू रूग्ण आणि रुग्णालय यामध्ये दुवा साधण्याचे काम मदत कक्ष करत आहे. गरजू रुग्णाला राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच विविध ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून समन्वयाची जबाबदारी पार पाडली जात आहे. तसेच या कोरोना काळात रुग्णालय, बेड, रुग्णवाहिका, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कॉन्सन्ट्रेटर व औषधे अशा विविध प्रकारची मदत मिळवून देण्याचे काम कक्षातील कोविड वॉर रूम मध्ये करताना दिसत आहे. मंगेश चिवटे सह १५ जणांची टीम या वॉर रूमचे काम करत आहे.
मोठ्या आजारांसाठी मदत
कॅन्सर, ब्रेन ट्युमर, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असलेल्या शस्त्रक्रिया, कोकलीयर इम्प्लॉट, एन.जी.ओ. प्लास्टी, बायपास सर्जरी आदी महागड्या शस्त्रक्रिया सर्वसामान्य रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. यासारख्या आजारांची देखील कामे या वैद्यकीय मदत कक्षाकडून होत आहेत. यात प्रामुख्याने प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, कारो ट्रस्ट, चाईल्ड हेल्प फाउंडेशन, जय गणेश ट्रस्ट आदी संस्थांकडून अर्थसहाय्य मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना नेते आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या जय अंबे माँ ट्रस्टच्या माध्यमातून तसेच डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे गरजू रुग्णांना थेट अर्थसहाय्य करत आहेत.
आजवर 45 कोटी रुपयांहून अधिक गरजूंना मदत
ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून आजपर्यंत एकूण 55 पेक्षा अधिक महाआरोग्य शिबीरात मिळून 3 लाख 25 हजार पेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षांत या तपासणीतून निदान झालेल्या जवळपास 12 हजारहुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू, एन.जी.ओ. प्लास्टी, बायपास, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, कोकलीयर इम्प्लॉट यांसारख्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. महात्मा फुले योजनेअंतर्गत किंवा धर्मादाय रुग्णालयात मोफत / सवलतीच्या दरात किंवा संबंधित रुग्णावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णांना बिलात सवलत मिळवून देण्यात कक्षाला यश आले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून आजवर 45 कोटी रूपयांहून अधिक मदत गरजू रूग्णांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
हेही वाचा - 'प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरू करा'