ठाणे - घोडबंदर येथील सूरज वॉटर पार्कसमोर असलेल्या वाघबीळ ब्रीजवर लाईट नसल्यामुळे दररोज अपघात होतात. याबाबत अभिनेता कुशल बद्रिके यांने फेसबुक लाइव्ह केले. यानंतर ठाण्यातील शिवसेना, मनसे, भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी धाव घेत महानगरपालिका प्रशासन, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. तर या पुलावर अपघात प्रवण ठिकाणी प्रशासन लवकरात लवकर दुभाजक आणि दर्शनी फलक लावणार असल्याचे सांगितले.
वाघबीळ ब्रीजवर होणारे सततचे अपघात थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मराठी अभिनेता कुशल बद्रिकेने अधिकाऱ्यांना केले आहे. काल याच भागात एका मालवाहतूक गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला आणि हाता-पायाला मार लागला आहे. सध्या महिलेवर खासगी रुग्णयात उपचार सुरू आहेत.
कुशल बद्रिके यांनी फेसबुक लाइव्ह केल्यानंतर भाजपा आमदार संजय केळकर यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भाजपा पाठोपाठ मनसेने आणि युथ काँग्रेसने सावधगिरीचा फलक लावला असून प्रशासनच्या विरोधात घोषणा बाजी केली. तर सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कुशल बद्रिके यांनी अपघाताची माहिती दिल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करत पालिका प्रशासनाला तत्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत.