ठाणे अनलॉकपासून उल्हासनगरात पुन्हा अवैध धंद्याचे पेव फुटल्याचा आरोप करत अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील धांगडधिंगा सुरू असतानाच बुधवारी (दि. 13 जाने.) मध्यरात्रीच्या सुमाराला एका बारमध्ये घुसून बारबालांचा नाच बंद केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवई-विठ्ठलवाडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल आचल पॅलेस बार अॅण्ड रेस्टारेंटमध्ये घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आत घुसलेल्या कार्यकत्यांनी बारमधील अश्लील धांगडधिंगा मोबाईल कॅमेऱ्यात कैदही केला आहे.
विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच शेकडो महिलांनी एकत्र येऊन कल्याण पूर्वेतील सत्यम नावाच्या लेडीज बारवर हल्लाबोल करत बार बंद केला होता. तर बुधवारीच रात्रीच्या सुमारास नांदिवली गावातील कशिश बारवर कोळसेवाडी पोलिसांनी छापेमारी करत 35 बारबाला ताब्यात घेतले. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात लेडीजबारच्या नावाखाली 'छमछम' सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारमध्ये घुसण्याआदी कळवले होते पोलिसांना
हॉटेल आचल पॅलेस बार अॅण्ड रेस्टारंटमध्ये घुसण्यापूर्वी उल्हासनगर अखिल भारतीय वाल्मिकी सजमाचे अध्यक्ष रवी करोतिया यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. मात्र, पोलीस वेळेवर न आल्याने उल्हासनगर वाल्मिकी सजमाचे काही कार्यकर्ते आत शिरत सुरू असलेला बारबालांचा अश्लील धांगडधिंगा बंद पाडला.
पोलसांना घटनेचा पत्ताच नाही
बारमध्ये घुसत बार बंद केल्याच्या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांच्याकडे विचारणा केली असता, मी रजेवर असून याबाबत आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगितले. अधिक माहिती पाहिजे असेल, तर पोलीस ठाण्यातून घ्या, असे सांगतले. तर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता पोलीस ठाण्यात याबाबत कुठली नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा, सायकस्वारांना पोलिसांनी अडवले