ठाणे - राज्य शासनाने अवैध वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. मात्र असे असतानाही वाळू तस्करांकडून अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी खाडीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांना मिळाली होती. त्यांनतर अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे तसेच माहुल विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाने गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत तालुक्यातील काल्हेर, कशेळी तसेच कोनगाव खाडीत छापे टाकले. या छाप्यांमध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 30 लाख रुपये किंमतीचे 3 सक्शन पंप आणि 3 बार्ज जप्त करण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल केला नष्ट
महसूल विभाग व पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे तीन सक्शन पंप आणि बार्ज जप्त करण्यात आले आहेत. त्यांना नष्ट करण्यात आले आहे. तसेच खाडी किनाऱ्यावरून अवैध वाळू वाहतूक करणारे एकूण 5 वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये 10 लाख रुपये किंमतीची 10 ब्रास वाळू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून, या कारवाईमुळे कल्याण व भिवंडीतील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.