ठाणे - नाश्ता वेळेवर न दिल्याने एका सासऱ्याने आपल्या सुनेला गोळी मारल्याने खळबळ उडाली. ही घटना राबोडी परिसरात घडली असून गंभीर जखमी झालेल्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सासरा फरार झाल्याने पोलीस सासऱ्याचा शोध घेत आहेत.
ठाण्यातील राबोड़ी परिसरात राहणारे काशीनाथ पाटील (76) हे रेती व्यवसायिक आहेत. काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा पाटील (42) यांच्यात गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास वेळेत नाश्ता दिला नाही, या कारणावरून किरकोळ वाद झाला. याचा राग आल्याने काशीनाथ पाटीलने आपल्या पिस्तुलातून सुनेवर गोळीबार केला. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्या. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. ज्या पिस्तूलातून गोळी झाडण्यात आली तिचा रितसर परवाना आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी घाटेकर यांनी दिली. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काशीनाथ पाटील सध्या फरार असून राबोड़ी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.