ठाणे - मुंबई नाशिक महामार्गावरून टेम्पोत गोमांस भरून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. गस्तीवर नारपोली पोलिसांनी १ हजार ४०० किलो गोमांस आणि टेंपो जप्त केले असून चालकाला अटक केली आहे. नासीर हुसेन उर्फ मलिक हुसेन कुरेशी (२१ रा. कुरेशीनगर, कुर्ला) असे या चालकाचे नाव आहे. तर शानू हुसेन कुरेशी (२८ रा. कुर्ला ) हा त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेवून फरार झाला आहे.
नासीर हुसेन आणि शानू कुरेशी या दोघांनी संगनमताने पडघा-तळवली भागातून गोवंश जनावरांची कत्तल केलेले ४७ हजार किंमतीचे १४०० किलो गोमांस टेम्पोमध्ये ( क्र.एमएच - ०३ - सीपी ६४९९ ) भरून ते मुंबईतील कुर्ला येथे विक्रीसाठी घेऊन जात होते. त्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बुऱ्हाडे यांनी पोलीस पथकासह माणकोली नाका येथे सापळा लावून टेम्पोची तपासणी केली असता ताडपत्रीमध्ये गोमांस आढळून आले. सदर गोमांस जप्त करून त्याची न्यायालयाच्या आदेशाने तत्काळ विल्हेवाट लावण्यात आली. तर ३ लाख ४० हजार किंमतीचा लेलँड टेंपो जप्त करून चालक नासीर यास अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.