नवी मुंबई - माथाडी कामगारांच्या तब्बल १०० कोटींच्या ठेवी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. या ठेवी ज्या बँकांमधून लाटल्या आहेत त्या बँकांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, राज्य सरकारने या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी मागणी माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी केली आहे. तसेच अपहार केलेल्या दोषी अधिकारी व बँकांवर कारवाई न केल्यास लेबर कमिशनर व बोर्डाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. नवी मुंबईतील माथाडी भवन येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - सोलापुरात कांद्याला देशातील विक्रमी दर, प्रतिक्विंटल 20 हजार रुपये
शिंदे यांनी सांगितले की, सरकारतर्फे अनेक बोर्ड आहेत. यात रेल्वे बोर्ड, आयर्न बोर्ड, कापड बोर्ड, मेटल बोर्ड व ग्रोसरी बोर्ड यांचा यात समाविष्ठ आहे. या बोर्डात काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या मजुरीतून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधी तसेच कामगारांची इतर ठेवींच्या स्वरूपात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवी ठेवण्यात येतात. त्यानुसार अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. या कामगारांच्या मजुरीतील पैसे बोर्डाकडून ठेवींच्या स्वरूपात बँकांत ठेवल्या होत्या. मात्र, या पैशांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या बोर्डात काम करणारे सर्व माथाडी कामगार हे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनशी जोडले आहेत. सध्या या बोर्डावर प्रशासक नेमण्यात आले आहे.
याबाबत अनेकदा बोर्डाकडे माहिती मागून देखील याबाबत माहिती देण्यास बोर्ड टाळाटाळ करत आहे. मुख्य म्हणजे सहकारी बँकांमध्ये या ठेवी ठेवण्यास कायद्यानुसार बंदी असल्याने त्या सरकारी बँकांत ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, ५० हजार पेक्षा जास्त कामगारांच्या तब्बल १०० कोटींच्या ठेवींचा अपहार खोट्या सह्या करून उघड झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व अपहारास बँकादेखील जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून सरकारने गांभीर्याने यात लक्ष देण्याची मागणी करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रीयकृत बँका या रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत येतात. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने देखील लक्ष घालणे गरजेचे आहे.
हेही वाचा - सोलापुरात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद; दर पाडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा आरोप
खासदार सुप्रिया सुळे तसेच इतर खासदारांना सांगून शून्य प्रहरात या १०० कोटींच्या गैरव्यवहाराविषयी प्रश्न उपस्थित करण्यासाठी सांगितले असल्याचे शिंदे म्हणाले. कोर्टात केस सुरू आहे. मात्र, या बँका संबंधित अधिकाऱ्याने हा गैरव्यवहार केल्याचे सांगून त्यास बँक जबाबदार नसल्याचे सांगत आहेत. ही पाळवाट असल्याचे दिसून येत आहे. केसचा निकाल लागल्यावर माथाडी कामगारांचे पैसे मिळतील. मात्र, व्याज बुडत आहे. याची जबाबदारी कोण घेणार? हे व्याज माथाडी कामगारांना कसे मिळणार? हा प्रश्न अनुत्तरित असून त्याची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच जर याबाबत माथाडी कामगारांना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला. यावेळी अपहारात कोणत्याही कामगार संघटनेचा अथवा राजकीय नेत्यांचा हात नसल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच बॅंकांतील रे रॅकेट मोडीत काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.