ठाणे - पत्नीचे गावात राहणाऱ्या एका तरुणाशी अनैतिक संबध असल्याच्या संशयातून पतीने २६ वर्षीय तरुणाला घरातच विजेचे शॉक देऊन त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाची हत्या करून त्याचा विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह घरानजीकच्या माळरानात फेकून दिला. ही घटना शहापूर तालुक्यातील चिंचवली गावात घडली आहे. याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोला अटक केली आहे. पुंडलिक नानु वाळिंबे असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, जयेश वाळिंबे (वय २६ ) असे विजेचा शॉक देऊन हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
कुटूंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पुंडलिक शहापूर तालुक्यातील चिंचवली गावात पत्नी व कुटूंबासह राहतो. त्याच गावात मृतक जयेश राहात होता. त्यातच पत्नीशी मृतकचे अनैतिक संबध असल्याचा आरोपीला संशय असल्याने मृत जयेशशी वादही झाला होता. याच वादातून गेल्या शुक्रवारी ( २२ जुलै ) रोजी मृत जयेशला आरोपीने स्वतःच्या घरात गाठले. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन आरोपीने जयेशला विजेचे शॉक देऊन त्याला घरातच ठार मारले. त्यानंतर कोणाला संशय नको म्हणून जयेशचा विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह घरानजीकच्या माळरानात फेकून दिला होता. दुसरीकडे जयेश घरी न आल्याने त्याच्या कुटूंबाने त्याचा दुसऱ्या दिवशी शोध घेतला. मात्र आढळून आला नसल्याने बेपत्ता झाल्याची कुटूंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ५ दिवसांनी जयेशचा गावाजवळील माळरान भागात विवस्त्र व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
काल अटक आरोपीला न्यायालयात हजर केले - या घटनेची माहिती किन्हवली पोलीसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून पोलीस ठाण्यात हत्येसह पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान, घटना उघडकीस आल्यापासून आरोपी पुडंलिकवर संशय व्यक्त केला. जात होता, त्यानंतर किन्हवली पोलीसांनी सापळा रचून आरोपीला राहात असलेल्या गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यानेच विजेचे शॉक देऊन जयेशला ठार मारून त्याचा मृतदेह फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. काल अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - IND vs WI 1st T-20 : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन