ठाणे - शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिरागनगरमध्ये एका ८२ वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचा कोरोनाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरीक धास्तावले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या १८ नातेवाईकांना क्वारंटाईन होण्यास विलंब होत असल्याने कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
चिरागनगर परिसरात एक ८२ वर्षीय व्यक्ती आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांना ताप आणि इतर लक्षणे असल्याने त्यांची १८ मे रोजी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझटिव्ह आला. मात्र, त्याआधी ही माहिती उघड झाली नसल्याने त्यांचे नातेवाईक आणि काही नागरिक त्यांच्या अंत्यसंस्कारसाठी गेले होते. जे लोक अंत्यसंस्कारासाठी गेले होते त्या १८ ते २० जणांना क्वारंटाईन करणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप चिरागनगरमधील काही रहिवाशी करत आहेत.
चिरागनगर हा झोपडपट्टीचा भाग असल्याने या ठिकाणी घरे लागून आहेत. याशिवाय सार्वजनिक शौचालय असल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढला असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांचा रिपोर्ट लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी लावला आहे. त्यांनी चाचणी देखील खासगी लॅबमध्ये केली होती, त्यांच्याकडून रिपोर्टची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांनी उशिरापर्यंत रिपोर्ट दिला नाही. अत्यंविधीसाठी गेलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.