ठाणे- मोबाईलवर चॅटिंग करताना शुल्लक वाद झाल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २७ जून रोजी भिवंडी तालुक्यातील वेहेळे गावातील दादोबा चौकात घडली होती. मात्र, या घटनेत गंभीर जखमी झालेला रोशन बाळकृष्ण चव्हाण याचा आज (सोमवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मृत रोशन हा त्याचा मित्र आशिष रमणथळे (१८) याच्याशी मोबाईलवर चॅटिंग करत होता. त्यादरम्यान त्यांच्यामध्ये शुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. रागाच्याभरात अशिषने रोशनच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी झाला होता. त्याला बेशुद्धावस्थेत प्रथम ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करून त्याच्या डोक्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केले गेले होते. मात्र, त्याची मृत्यूशी झुंज सुरू असतानाच आज सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली.
ज्या दिवशी रोशनवर हा जीवघेणा हल्ला झाला होता, त्यावेळी नारपोली पोलीस ठाण्यात हल्लेखोर मित्र आशिष विरोधात भादवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, जीवे ठार मारण्याची घटना झालेली असताना, पोलिसांनी हल्लेखोराला पाठीशी घातल्याने त्याला दोनच दिवसात जामीन मिळाल्याने तो मोकाट फिरत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता पोलिसांनी आशिषवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नारपोली पोलीस करीत आहेत.