नवी मुंबई - आयुष्याला कंटाळून आत्महत्या करणारे अनेक जण वाशी खाडीने पाहिले आहेत. मात्र, या खाडीत अचानक दिसलेल्या डॉल्फिनच्या जोडीने या खाडीची परिभाषाचं बदलली आहे. सध्या खाडीत फिरणारी ही डॉल्फिनची जोडी नवी मुंबई परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
डॉल्फिनचा व्हिडिओ व्हायरल -
वाशी खाडीत अचानक दोन बेबी डॉल्फिन पहायला मिळाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वाशीच्या खाडीत बेबी डॉल्फिन उडी मारत असल्याचे पाहून, प्रत्यक्षदर्शींना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. खोल समुद्रात विहार करणाऱ्या डॉल्फिन माशांची जोडी वाशी खाडीत आढळल्याने लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून डॉल्फिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मच्छिमारांनी प्रत्यक्ष पाहिले डॉल्फिन -
नवी मुंबईतील सारसोळे गावच्या मच्छीमारांना डॉल्फिनचे प्रत्यक्षात दर्शन घडल्याची माहिती समोर येत आहे. माहुल व नवी मुंबईतील सारसोळे खाडीलगत डॉल्फिन जलविहार करताना कोळीवाड्यातील मच्छीमारांनी प्रत्यक्षात पाहिले आहे. अत्यंत खोलवर पाण्यात आढळणारा डॉल्फिन मासा भरकटल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या खाडीत आला असावा. बोटीतून फिरत असताना मुंबईतील एका मच्छीमाराला डॉल्फिनची जोडी दिसली. ही जोडी पाहतात त्याला व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही.