ठाणे - पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पार्टी ड्रग्स अर्थात एलएसडी पेपर या अंमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या चौकडीचा पर्दाफाश केला. सलमान नवाबअली शेख (28, रा.मुलुंड), संजीव उर्फ पॉल रामआग्या चौहान (27, रा. नवीमुंबई), नितीन मारुती लामतुरे(33, रा. नवीमुंबई) आणि सुशांत संभाजी रसाळ (32, रा.कळबोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना ठाणे न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी येऊर आणि उपवन परिसरात गस्तीवर असताना त्यांना सलमान शेख आणि चौहान या दोन संशयास्पद व्यक्ती दिसल्या. संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एमडी आणि एलएसडी पेपर असा 25 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा आढळला. सलमान शेख आणि चौहान यांचीच सखोल चौकशी केल्यानंतर नितीन लामतुरे आणि सुशांत रसाळ यांच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा -
सुशांत रसाळ हा या टोळीचा मास्टरमाईंड आहे. त्याच्या घरातून मोठया प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यात डिझायनर ड्रग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अंमली पदार्थाचे 109 पेपर सापडले आहेत. 58 ग्रॅम एमडी पावडर, 6.4 ग्रॅम चरस आणि 98 हजारांची रोख रक्कम असा एकूण 11 लाख 61 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पकडण्यात आलेले अंमलीपदार्थ कोणाला विकण्यात येणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत.