ठाणे- ठाणे विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये भाजपचेच दोन नगरसेवक आपसात भिडले. प्रभाग क्रमांक २४ चे भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील तर त्याच पक्षाच्या नगरसेविका दीप गावंड यांचे पती प्रशांत गावंड हे आपसात भिडले. अखेर उमेदवार संजय केळकर याना मध्यस्थी करून हे भांडण सोडवावे लागले. उमेदवाराला कोणत्या परिसरातून फिरवायचे यावरून ही हाणामारी झाल्याचे कारण देण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र भाजपच्या दोन नगरसेवकांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे उमेदवार संजय केळकर यांचे त्यांच्या मतदार संघात प्रचार सुरु आहे. यानिमित्ताने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान जेव्हा केळकर यांची प्रचार रॅली प्रताप सिनेमाजवळ आली तेव्हा उमेदवारांना आपापल्या परिसरात फिरवण्यासाठी नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड आणि नगरसेवक कृष्णा पाटील यांच्यात वाद झाला. त्यांनतर कृष्णा पाटील यांचे नातेवाईक सचिन पाटील यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे समजते. हा वाद आणखी वाढला आणि त्यानंतर नगरसेवक कृष्णा पाटील आणि प्रशांत गावंड यांच्यात हाणामारी झाली. अखेर उमेदवार संजय केळकर याना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला.
हेही वाचा- 'भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा घेतल्यास बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या'
प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपचे चार नगरसेवकांचे पॅनल निवडून आले आहे. यामध्ये कृष्णा पाटील, त्यांच्या पत्नी नंदा पाटील, दीपा गावंड आणि मिलिंद पाटणकर हे चार नगरसेवक निवडून आले आहे. मात्र कृष्णा पाटील आणि दीपा गावंड यांच्यात विकासकामांवरून सुरुवातीपासून वाद असल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे मात्र भाजपच्या नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे .
हेही वाचा- राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळीचा आस्वाद