ठाणे - भिवंडीत धामणकर नाका मित्रमंडळाच्या गणेश उत्सवात पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज गाथा मंदिराचा हुबेहूब देखावा साकारण्यात येत आहे. तब्बल 125 फूट उंचीची ही प्रतिकृती असून पर्यावरण पूरक रित्या उभारण्यात येत आहे. या देखाव्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले असून हे मंदिर उभारण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून तब्बल अडीचशे कारागीर अहोरात्र काम करत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धामणकर नाका मित्र मंडळाचे यंदा 31वे वर्ष असून या मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रांतातील मंदिराचे देखावे उभारण्यात येतात. यंदाही मंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी असलेल्या संत तुकाराम महाराज गाथा मंदिराचा हुबेहूब 125 फूट देखावा तयार करण्यात येत असून त्याचे काम आज रात्री अंतिम टप्प्यात येणार आहे. या मंदिराला उभारण्यासाठी कलकत्त्याहून आलेले सुमारे दोनशेच्या वर कामगार मंदिराची कलाकुसर करण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहे.
125 फुटाचं भव्यदिव्य मंदिर हे निव्वळ लाकडी फळ्या, बांबू, कपडे ,दोरा ,खिळे, रबर यापासून तयार करण्यात येत आले आहे. धामणकर नाका मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीच विविध राज्यांच्या मंदिरांची हुबेहूब छबी उभारण्यात येत असल्याने ठाणे जिल्ह्यासह पालघर, मुंबईतूनही भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शेकडो सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरेही संपूर्ण परिसरात लावण्यात आले. तर संपूर्ण दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवात दर दिवशी समाज जनजागृती, विधवा, गरजू विद्यार्थ्यांना मदतीच्या कार्यक्रमासह माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने चित्रकला स्पर्धा भरविण्यात येते. या चित्रकला स्पर्धेमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होतात. विशेष म्हणजे या मंडळाच्यावतीने दरवर्षी वृद्धाश्रमातील वृद्धांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून पूजापाठ केला जातो.