ठाणे : एका महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्याकडून दोन लाखांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकासह शिपाईला ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालयात घडली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करून मुख्याध्यापकासह शिपाईला अटक केली आहे. प्राध्यापक, सुग्रीव बाबुराव आंधळे (५२) आणि शिपाई वसंत भाऊ हरड (५७) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. तर घटनेची कुणकुण लागताच महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव बुवाजी कांबळे फरार झाले आहेत. (A constable along with the principal was arrested )
ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार : तक्रारदार ५८ वर्षीय महिला कर्मचारी ह्या वज्रेश्वरी येथील अंबिकाबाई जाधव महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांना रुग्ण निवेदनातुन कर्तव्यावर हजर करून घेऊन मागील शिल्लक वेतन अदा करण्यासाठी लाचखोर प्राध्यापकसह प्राचार्य यांनी त्यांच्याकडे ५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातच लाचखोरांनी ३ डिसेंबर २०२२ रोजी तडजोड करून कर्मचारी महिलेकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या संदर्भात तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार (Complaint to Thane Anti-Corruption Department) दिली.
अधिक तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करत आहे : त्या तक्रारीच्या अनुषगांने ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने ५ डिसेंबर रोजी महाविद्यालयात गणेशपुरी पोलिसांसह सापळा रचून प्राध्यापक, सुग्रीव आणि शिपाई वसंत या दोघा महाविद्यालयात २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक लाचखोरांना आज न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करत आहे.