ठाणे - कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यापाऱ्याने शनिवारी संध्याकाळी राहत्या घरी 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील अशोक नगर परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या इमारतीमध्ये घडली. मुकेश प्रेमचंद नागडा (56) असे मृतकाचे नाव आहे.
मुकेश प्रेमचंद नागडा (56) यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली की, आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली? याबाबत उलटसुलट बोलले जात आहे. मुकेश नागडा यांचा यंत्रमागाचा व्यवसाय होता. गेल्या 5 वर्षांपासून यंत्रमाग व्यवसायात मंदी असल्याने त्यांचा संपूर्ण व्यवसाय डबघाईला आला होता. त्यामुळे मुकेशने व्यवसायासाठी बॅंक व सावकाराकडून व्याजाने मोठे कर्जही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे व्यापारात मंदी असल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे? अशी चिंता मुकेशना सतावत होती.
कर्जाच्या चिंतेने ग्रासलेल्या मुकेशने राहत्या इमारती च्या 7व्या मजल्यावरून शनिवारी सायंकाळच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची नोंद शांती नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.