ठाणे- कोरोना या महाभयंकर महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असून महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना म्हणजे मृत्यूच असा काही नागरिकांचा समज झाला आहे. मात्र, कोरोना म्हणजे मृत्यू, असे काही नसून अनेक कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. याचेच उत्तम उदाहण ठाण्यात बघायला मिळाले. येथे एका 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाबर मात केली आहे.
हेही वाचा- राज्यात दोन दिवसात ६२ कोटी ५५ लाख रुपयांची मद्य विक्री
आज ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथून तब्बल 16 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाशी यशस्वी दोन हात करणाऱ्यांमध्ये एका 90 वर्षांच्या आजी आणि पाच वर्षाखालील 3 बालकांचाही समावेश आहे. येथील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले त्याला अखेर यश येऊन हे 16 जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. यावेळी या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी रुग्णालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून या रुग्णांचे अभिनंदन करीत टाळ्या वाजवल्या. तसेच 'हम होंगे कामयाब' म्हणत कोरोनाला आपण हरवणार असा संदेश दिला.