ठाणे- कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण ठाण्यात वाढला असून त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर 9 जणांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. परंतु, त्यांचे अद्यापही रिपोर्ट आले नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याने ज्या खासगी लॅबमधून टेस्ट केली होती. ती नौपाड्यातील लॅबही बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
हेही वाचा- लॉक डाऊन : रत्ने आणि मौल्यवान परिषद कर्मचाऱ्यांना देणार ५० कोटींचा निधी
पहिला रुग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर आता 39 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, त्याने ही माहिती लपवली होती. त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली. तर त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी खासगी पॅथलॅबमधून तपासणी केली होती. त्यानंतर तो स्वत: रुग्णालयात जाऊन दाखल झाला आहे. आता त्या लॅबची माहिती पालिकेला मिळाली असून ती लॅब सील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, या नागरिकाला याची लागण कशी झाली. याची माहिती तो देत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पोलीस बळाचा वापर करण्याचा विचार पालिकेने केला आहे. तुर्तास त्याच्या घरातील 9 जणांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. परंतु, ती व्यक्ती अन्य कोणाच्या संपर्कात आली आहे, याची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही.
दरम्यान, आता पर्यंत पालिकेच्या माध्यमातून 26 मार्च पर्यंत 1 हजार 676 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 878 नागरिक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या 798 जणांचा त्यात समावेश आहे. तर आतापर्यंत 1 हजार 633 जणांना घरीच देखरेखाली ठेवण्यात आले आहे. तर 40 जणांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील 30 जणांना तपासणी करुन घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत 10 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एकाचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह होता. तर अन्य 9 जण हे संशयित आहेत. आता अन्य एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून तो खाजगी रुग्णालयात उपाचार घेत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तर पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात 10 संशयितांना देखरेखाली ठेवण्यात आले आहे.