ठाणे- नवरात्रीचा पहिला दिवस कल्याणातील वैष्णवी रुग्णालयासाठी काहीसा खास आणि दुर्मीळ ठरला. या रुग्णालयात काल एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची घटना घडली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडेच चर्चा होत आहे.
कल्याणातील सुप्रसिद्ध डॉ. अश्विन कक्कर यांच्या वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयासाठी शनिवारचा दिवस वेगळाच ठरला. शनिवारी त्यांच्या रुग्णालयात तब्बल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली. ज्यामध्ये 9 महिलांनी मुलींना जन्म दिल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. विशेष म्हणजे, कालपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रुग्णालयात 9 मुलींचा जन्म झाला. त्यामुळे या मुलींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
आमच्या रुग्णालयात एकाच दिवशी 11 महिलांची प्रसूती होणे, तशी नवीन गोष्ट नाही. मात्र एकाच दिवशी आणि तेही नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म होणे, ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब असल्याचेही डॉ. अश्विन कक्कर यांनी सांगितले. या 9 मुलींसह इतर 2 मुलांची आणि त्यांच्या आईची तब्येत ठणठणीत असून वैष्णवी रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या 9 मुलींच्या जन्माची चर्चा सर्वत्र सुरू आहे.