मिरा भाईंदर (ठाणे) - कोरोनामुळे थंड पडलेल्या पालिकेच्या उत्पनाला पूर्व पदावर आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात 85 कोटी 70 लाख कर वसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा डिसेंबर महिन्यात प्राप्त झालेली करवसुलीचा आकडा हा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर शहरात सुमारे 3 लाख 42 हजार मालमत्ता असुन त्यात निवासी मालमत्तांची संख्या 2 लाख 87 हजार तर व्यावसायिक मालमत्तांची संख्या 55 हजार इतकी आहे. पालिकेने सन 2020-21 या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 271 कोटींचे उत्पन्न निश्चित केले आहे.
टाळेबंदीमुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली होती. पालिकेच्या उत्पन्नातील महत्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली कोरोनामुळे रखडल्याने पालिकेकडून ऑनलाईन कर भरणी प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, ही वसूली एकुण उद्दीष्टापैकी केवळ 0.55 टक्के इतकीच झाली. त्यामुळे पालिकेने ऑगस्ट महिन्याच्या मध्यान्हात कराची देयके वाटण्यास तसेच ऑनलाईनसह थेट कर वसूलीला सुरूवात केली.
प्रशासनाकडून विविध उपाय योजना -
करवसुली उत्पनावर पालिका प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवण्यात आल्याने सप्टेंबरपर्यंत झालेल्या 25 कोटी कर वसुलीत वाढ झाली. दोन महिन्यात 60 कोटीची वाढ होऊन तब्बल एकूण 85 कोटी 70 लाख रुपयाची कर वसुली झाली आहे. तसेच येत्या काळात अधिक उपाययोजना आखून ठरवलेले उद्धिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती कर निर्धारक आणि संकलन विभाग अधिकारी संजय दोंदे यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वसूली -
कोरोनामुळे यंदा करवसुलीचा मोठा फटका सहन करावा लागणार, अशी भीती पालिका प्रशासनामध्ये निर्माण झाली होती. मात्र, तरी देखील डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला 85 कोटी 70 लाखाची कर वसुली झाली आहे. ही कर वसुली गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 कोटीहून अधिक असल्याची माहिती उपकर निर्धारक व संकलन अधिकारी प्रभाकर म्हात्रे यांनी दिली.
हेही वाचा - सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या