ठाणे- परतीच्या अवकाळी पावसाने कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याने शंभरी पार केली. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कांद्याचे भाव सर्वसामान्याच्या आवाक्यात राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशातून आयात केली. इराणमधून भिवंडीत आयात केलेला 80 टन कांदा आता कोंब फुटून सडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
हेही वाचा- जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण
भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत हद्दीत आसरा हॉटेलच्या मागे एका बंद यंत्रमाग कारखान्यात इराणमधून आयात केलेला कांदा साठवण्यात आला आहे. मात्र, याठिकाणी कांद्याला कोंब फुटून कांदा सडत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. हा कांदा सात ते आठ दिवसांपूर्वीपासून येथे साठवण्यात आला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
सोमवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने आरपीआय सेक्युलरचे मीठपाडा शाखा अध्यक्ष आकाश साळुंके यांना हा प्रकार समजला. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कांद्याबाबत माहिती घेतली. हा कांदा इराण देशातून आयात केल्याचे त्यांना येथील कर्मचाऱ्याने सांगितले. तर हा कांदा परेश मेहता या व्यापाऱ्याचा आहे. त्याने मिठापाडा येथील पवन शेठ याच्या कारखान्यात सध्या हा कांदा साठवून ठेवला आहे. सुमारे 80 टन हा कांदा असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापक रियाज अली यांनी दिली आहे.
दरम्यान, घटनास्थळी निजामपुरा पोलीस दाखल झाले असून पोलीस प्रशासनाने कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे, तर कृषी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निजामपुरा पोलिसांनी दिली आहे.