नवी मुंबई - शहरात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले असून चक्क दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत.
नवी मुंबई शहरात आढळलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा फिलिपाईन्स नागरिक होता. सदर व्यक्ती धार्मिक कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील वाशी येथे एका मशिदीत आली होती. या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आणखी दोन फिलीपाईन्स नागरिक व मौलवीला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे मुंबईतील कस्तुरुबा रुग्णालयात संबंधित कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांना हलविण्यात आले होते.
कोरोनाची बाधा झालेल्या मौलवीचा मुलगा, सून व दीड वर्षांच्या नातवाला होम क्वारंटाईन केले होते. मात्र, या तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून एकाच कुटुंबात आता चक्क 4 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत या कुटुंबाला कस्तुरुबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळाली आहे.
नवी मुंबईत कोरोनाबधितांची संख्या 8 झाली असून ऐरोलीमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. शहरात परदेशातून आलेल्या 95 नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे. नवी मुंबई शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शहरात धूर व औषध फवारणी करण्यात येत आहे.