ठाणे - पुरातून जीव वाचवत अनेक साप कल्याण पश्चिम परिसरातील मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना घडतच आहेत, असाच एक आठ फुटाचा सोसायटीत घुसल्याने येथील रहिवाशी सैरभैर झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना कल्याण पश्चिम परिसरातील महावीर सोसायटीमध्ये घडली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात पंधरा दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील अनेक सखल भाग जलमय होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. यात नागरिकांसह मुक्या प्राण्यांना ही जीव वाचवत दुसरीकडे स्थलांतर व्हावे लागले होते. त्यातच मागील पंधरा दिवसात कल्याण पश्चिम परिसरातून सर्पमित्रांनी मानवी वस्तीत शिरलेल्या सुमारे २० ते २५ विषारी बिनविषारी सापांना पकडून जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले आहे. असाच एक आठ फुटाचा साप कल्याण पश्चिम परिसरातील महावीर नावाच्या गृह संकल सोसायटीमध्ये काल (सोमवार) दुपारच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरला होता. या सापाला पाहून सोसायटीतील काही रहिवाशांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा साप सोसायटीच्या तळमजल्याच्या शिरला होता.
त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरून त्यांनी आपले दारे-खिडक्या बंद केल्या होत्या. त्यानंतर सोसायटीत राहणारे जयवंत टापरे यांनी वार संस्थेचे सर्पमित्र हितेश करणजवकर त्यांच्याशी संपर्क करून सोसायटीत सापडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी येऊन त्या सापाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केल्याने सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून ८ फूट लांबीचा आहे. या सापाला कल्याणचे वनपाल क्षेत्र अधिकारी एम. डी. जाधव यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली आहे.