ठाणे - कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा फायदा घेत, उल्हासनगरात एक दारू माफिया २० रबरी ट्युबमधून तब्बल ७०० लिटर गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखा व विठ्ठलवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून १ लाख ४० हजार १०० रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तिघे फरार झाले.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ४ येथील मानेरेगाव राहणारा दारू माफिया राजेश चोळेकर हा गावठी दारूचा साठा करून तो विक्री करीत होता. यासंदर्भातील गुप्त माहिती गुन्हे शाखा घटक ४ चे वपोनि महेश तरडे यांना मिळाली होती. पोनि महेश तरडे यांच्यासह पो.नि. मनोहर पाटील, सपोनि विशाखा झेंडे, सपोउपनि उदयकुमार पालांडे, सुरेंद्र पवार, पोकॉ सुनिल जाधव, निसार तडवी, हवालदार उज्वला मर्चंडे , रामचंद्र जाधव, भटु पारधी, दादासाहेब भोसले आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोउपनि राजपुत, त्यांचे कर्मचारी यांनी संयुक्त रित्या मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी आरोपी राजेश चोळेकर आणि त्याचे दोन साथीदारांनी गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा बाळगून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला.
हेही वाचा - ग्रीन झोन गडचिरोली : जिल्हा 'असा' राहिला कोरोनामुक्त, गडचिरोली प्रशासनाचे यश
पोलिसांना पाहताच त्या तिघांनी त्या ठिकाणाहून पलायन केले. पोलिसांनी त्या ठिकाणी २० रबरी ट्युब मध्ये ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि साहित्य असा एकुण १ लाख ४० हजार १०० रुपये किमतीचा मुद्ये माल जप्त केला. याप्रकरणी राजेश चोळेकर व त्याचे दोन साथीदार याच्या विरूद्ध महाराष्ट प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (क) अंतर्गत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अधिक तपास पोलीस करीत आहेत.