ठाणे - लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या २० वर्षीय मुलीसह ६ आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर मुलांना साहारा कॉलनी परिसरात पुरल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याठिकाणी खोदकाम केल्यानंतर त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र, आरोपींनी केलेल्या खुलाशामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान एका २ वर्षीय बालकाला सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.
मारकुनिस्सा जमाल अहमद शहा यांचा २ वर्षाच्या मुलाचे गेल्या २१ मार्चला अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांनी डॉयघर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी आफरीन मुन्ना खान (वय २०), मुबीन फिरोज शहा (वय ४०) अजीम इब्राहिम दिवेकर (वय ४६), अमीर अजीम दिवेकर (वय ४६), असिफा चाळ आणि अब्दुल अजीज शमशाद खान या ६ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २ वर्षीय मुलाची सुटका करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आतापर्यंत ८ मुलांचे अपहरण केल्याची कबुली त्यांनी दिली. सर्व मुले मुंब्रा, डॉयघर, ठाणे शहर, कळवा परिसरातील आहेत. तसेच त्यांना पुरण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा महापे रोड लकी कंपाउंडच्या बाजूला जेसीबीच्या साहाय्याने ३ ठिकाणी खोदकाम केले. मात्र, त्याठिकाणी काहीही आढळून आले नाही. त्यामुळे आरोपी पोलिसांना गुंगारा तर देत नाहीत ना? असा संशय बळावला आहे.