ठाणे - मीरा भाईंदरमधील कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या ५३ सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेने एकूण १ हजार ५९९ जणांची तपासणी केली होती त्यातील ५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून १ हजार ५९९ कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये चालक, सफाई कामगार, मुकादम, अशा एकूण ५३ कामगारांनाची कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या जास्त आहे, सर्वांना मिरारोडच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक कर्मचारी कोरोनावर मात करून कामावर रुजू देखील झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी ईटीव्ही भारतला दिली.