ठाणे- प्लास्टिक बंदी कारवाई अंतर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिना अखेर ठाणे महानगर पालिकेने प्लास्टिक वापरा विरोधात कडक कारवाई केली होती. या कारवाईत ५.७ टन प्लास्टिक जप्त करण्यात आला असून १ लाख ९० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक याबाबत अधिसूचना प्रसिध्द केल्या होत्या. सदर अधिसूचनांच्या अंमलबजावणीकरिता ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिबंधीत प्लास्टिक व थर्माकोल वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करणाऱ्या संस्था, आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.
प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण २०.५ प्लास्टिक संकलन करण्यात आले. ७२ रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थांच्यावतीने ७२ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दंडापोटी ९ लाख ४० हजार एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेर पर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून ५.७ टन प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे. ३०० रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थांच्यावतीने २८९ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दंडापोटी १ लाख ९० हजार एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
प्लास्टिकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाऱ्या असून पर्यावरणास हानीकारक आहेत. या वस्तुंची विक्री आणि वापर दोन्ही बेकायदा असून त्याचा वापर करताना पहिल्यांदा आढळल्यास ५००० रुपये, दुसऱ्यांदा आढळल्यास १०००० हजार रुपये, आणि तिसऱ्यांदा आढळल्यास २५००० हजार रुपये व ३ महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून ठाणे शहर स्वच्छ राखण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा- हंगामातील पहिली स्ट्रॉबेरी नवी मुंबईत दाखल