नवी मुंबई - उपनगरात कोरोनाने थैमान घातले असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतचं आहे. मंगळवारी नवी मुंबईत एका दिवसात 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता, अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत कार्यरत असणाऱ्या नागरिकांना तिथेच राहण्याचे आवाहनही नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहरात 199 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत 2 हजार 509 लोकांची कोविड- 19 चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 1 हजार 720 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून, 609 जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत. मंगळवारी 258 जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 215 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 43 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये तुर्भेमधील 16, कोपरखैरणे मधील 9, घणसोलीमधील 7, वाशीमधील 5, ऐरोलीमधील 3, नेरुळमधील 2, बेलापूरमध्ये1 असे 43 जणांचा समावेश आहे.