ठाणे - भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात दरोडेखोरांनी दान पेट्या फोडून लाखोंची रोकड पळविल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ माजवला आहे. आता चोरट्यांनी पोगाव परिसरातील एका बंगल्यावर धाडसी दरोडा घातल्याची घटना समोर आली आहे. बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून रोकडसह तब्बल ४३ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे.
या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाडसी चोरीचा गुन्हा अज्ञात चोरट्यांनविरोधात दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, व्यवसायिक विश्वास उर्फ बाबा पाटील कुटुंबासह भिवंडी तालुक्यातील पोगाव येथे बंगल्यात राहतात. ते त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यात संपूर्ण पाटील कुटुंबीय भिवंडी जवळ असलेल्या खोणी गावात गेले होते. बंगल्यात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंगल्याच्या तळमजल्यातील बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश करून लाकडी कपाटातील रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
दरम्यान, विवाह सोहळा आटपून पाटील कुटुंबीय बंगल्यावर परतले असता, त्यांना बेडरूमच्या कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. तर बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडलेल्या स्थितीत आढळून आले. पाटील यांच्या माहितीनुसार चोरट्यांनी घरातून ४३ लाख रुपयांचा ऐवज चोरला असून यामध्ये १० लाख रुपयांची रोकड असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी विश्वास पाटील यांनी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तर गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत 'फिंगर प्रिंट' व श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.