मीरा भाईंदर - भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील रहिवासी रेहान बोर्जीस यांची फेसबुकवर एका महिलेची मैत्री झाली. त्या महिलेने वेगवेगळ्या कारणाने बँकेत पैसे जमा करण्यास सांगून बोर्जीस यांची ८ लाख २५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. अशी तक्रार बोर्जीस यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, टाळेबंदीनंतर ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण -
रेहान बोर्जीस (वय ४२ डोंगरीगाव, उत्तन) शिपमध्ये काम करतात. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने ते अनेक महिन्यापासून घरीच आहेत. जून २०२० मध्ये त्यांना फेसबुकवर रोज स्मित या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती रिक्वेस्ट त्यांनी एक्सेप्ट केली. त्यानंतर त्या महिलेने त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्या दोघांमध्ये मोबाईलवर व्हॉट्सअप ऑडिओ कॉलद्वारे बोलणे व्हायचे, यात त्यांची चांगली मैत्री जमली.
एके दिवशी रोज स्मितने बोर्जीस यांना सांगितले की, माझी बहीण मुंबईत लॉकडाउनमध्ये अडकली असून तिला पैशाची गरज आहे. तेव्हा त्यांनी तिच्या बहिणीच्या बँक खात्यावर साडेसात हजार रुपये जमा केले. त्यानंतर पुन्हा तिने बहिणीला घराचे भाडे द्यायचे आहे. म्हणून पैशाची मागणी केली, तेव्हा त्यांनी पुन्हा पैसे दिले. रोज स्मितने असे अनेक कारणे देत बोर्जीस यांच्याकडून ८ लाख २५ हजार ४०० रुपये उकळले.
पुन्हा पैशाची मागणी केल्याने, बोर्जीस यांनी माझ्याकडील सर्व पैसे संपल्याचे सांगत मी दिलेले पैसे परत कर, असे स्मितला सांगितले. तेव्हा तिने बोर्जीस यांचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. यानंतर बोर्जीस यांना आपली फसवणूक झाल्याचे कळून चुकले आणि त्यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात स्मित व तिची बहीण यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. शहरात अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडत असून यापासून सर्वांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.