नवी मुंबई - १० मार्चपासून नवी मुंबई शहरात कोरोनाच्या रूग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार 'मिशन ब्रेक द चेन' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये टेस्टिंगप्रमाणे लसीकरण वाढीवर भर देण्यात येत आहे. बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून अवघ्या तीन दिवसात ३ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
१५५ जणांची टीम विशेष पथकात कार्यान्वित -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना धडा शिकवण्यासाठी १५५ जणांची टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात पाच कर्मचारी आहेत. अशा एकूण ३१ पथकांच्या माध्यमातून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई केली जात आहे.
मोठ्या प्रमाणात दंड वसुली -
सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीनही शिफ्टमध्ये विशेष पथकांच्या कारवाया सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांंकडून तीन दिवसात या पथकाने ३ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. १ हजार १२० जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, थुंकणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.
ऑगस्टपासून १ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल -
१० ऑगस्टपासून आत्तापर्यंत नवी मुंबई मनपा क्षेत्रात कोरोनाचे नियमभंग करणाऱ्या ३१ हजार ३६४ व्यक्ती व व्यावसायिकांकडून, १ कोटी ३३ लाख, ६०हजार, २५० रुपयांचा दंड वसुल झाला आहे.
हेही वाचा - Live Updates : राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी