ठाणे : तीन बांगलादेशी तरुणांना नारपोली पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील माणकोली येथील इंडियन कंपाउंड गेटजवळ सापळा रचून अटक केली आहे. सोहेल इमाम शेख (२०), असीफ समसूद शेख (२१), तरीकूल अबूतालेब मंडल (४२) अशी गजाआड करण्यात आलेल्या बांगलादेशी तरूणांची नावे आहेत.
सापळा रचून केली अटक: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही बांगलादेशी तरुण गेली अनेक वर्षांपासून भिवंडीतील कोनगाव येथील माऊली अपार्टमेंटमधील धर्मनिवासात राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नारपोली पोलिसांना या बांगलादेशी तरुणांची गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळताच, १७ मे रोजी रात्री मानकोली येथील इंडियन कंपाउंडच्या गेटजवळील पानटपरी लगत सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, अनेक वर्षांपासून भिवंडीत राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर या बांगलादेशी तरुणांच्या विरोधात पोलीस नाईक सुनिल दिलीप शिंदे यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
२२ मे पर्यत पोलीस कोठडी: अटक केलेल्या तीन बांगलादेशी तरुणांकडे भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येवून अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याची प्रथम दर्शनी तपासात आढळून आले आहे. शिवाय अटक बांगलादेशी तरुणांकडे आधारकार्ड, पॅन कार्ड बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. अटक बांग्लादेशी तरुणांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता, २२ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.
छापा टाकून केले अटक: गेल्याच फेब्रुवारी महिन्यातही भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ बांगलादेशी मो.अबू ताहेर मोहम्मद.मुफझल हुसेन राहत होता. तालुक्यातील दापोडा रोड येथील प्रितेश कॉम्प्लेक्समधील रिबन एक्स्पोर्ट कंपनीत काम करतात. या प्रकाराची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने सदर कंपनीवर छापा टाकून बांगलादेशी घुसखोर मोहम्मद याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याचे मूळ गाव बूट बाजार बांगलादेश (जि.गाझीपुर) असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
९ बांग्लादेशी नागरिकांवर गुन्हा: भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शहरातील शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलिसांनी २०२१ साली छापेमारी करून तब्बल ४० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. विशेष म्हणजे यापैकी भिवंडीतील अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करणाऱ्या ९ बांग्लादेशी नागरिकांना कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यामुळे भिवंडी व आसपासच्या भागात आणखीही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून त्यावेळी व्यक्त केली होती.
अनधिकृतपणे वास्तव्यास राहत होते: पुन्हा शहरात बांगलादेशी नागरिकाचे वास्तव दिसून आल्याने, ठाणे व मुंबई जिल्ह्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. बांगलादेशी नागरिक भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने, छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून हावडा रेल्वे स्टेशन येथे येवून रेल्वेने प्रथम कल्याण व नंतर जिल्हातील इतर शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याचे यापूर्वीच्या छापेमारीत उघड झाले आहे.
हेही वाचा -