ठाणे - भिवंडी शहरात कोरोनाबाधित 4 नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीणमध्येही एकाच कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शहरातील 3 व ग्रामीण भागातील 8 रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर सध्याच्या घडीला शहरातील 22 तर तालुक्यातील 14 रुग्ण विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली आहे
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कमला हॉटेल येथील रहिवासी असलेले 28 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला असे दोघे जण कुलाबा मुंबई येथून आल्यानंतर त्यांना अलगिकरण कक्षात दाखल करून स्वॅबची तपासणी केली होती. तर कुर्ला येथून गायत्रीनगर येथे घरी परतलेल्या 62 वर्षीय महिला व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आल्याने एका 19 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे.
सध्या शहरातील 25 रुग्णांपैकी 3 रुग्ण बरे होऊन परतल्याने कोरोनाबाधितांची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन केंद्रात कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कात आलेले 294 व्यक्ती दाखल असून त्यांच्या स्वॅबची तपासणी सुरू असल्याची माहिती आष्टीकर यांनी दिली आहे. तर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील डुंगे ग्रामपंचायत क्षेत्रात तब्बल 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे तालुक्यातील 8 रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 14 वर पोहोचली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. नळदकर यांनी दिली आहे. 3 दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात कार्यरत डुंगे गावातील 42 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 8 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबची तपासणी केली असता, कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी, दोन मुले, आई वडील व भाऊ भावजय हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. 8 पैकी भावाचा 3 वर्षांचा मुलगा कोरोना निगेटिव्ह असल्याचे आढळून आल्याची माहिती भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे.
- भिवंडी करोना अपडेट -
महानगरपालिका क्षेत्र
कोरोनाबाधित - 21
नवे रुग्ण - 04
कोरोनामुक्त - 03
रुग्णालयात उपचारासाठी दाखल -22
- तालुका ग्रामीण क्षेत्र
कोरोना बाधित - 15
आज आढळलेले नवे रुग्ण - 07
कोरोनामुक्त - 08
रुग्णालयात उपचारासाठी दाखल - 14
महानगरपालिका व तालुक्यातील एकत्रित अलगिकरण केलेल्या व्यक्तींची संख्या - 294