ठाणे - भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 170 नवे रुग्ण आढळले असून शहरातील 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात 39 नवे रुग्ण आढळले आहेत. आज शहर व ग्रामीण भागात एकूण 209 नवे रुग्ण आढळले आहेत. भिवंडी शहरात आतापर्यंत 1 हजार 45 रुग्ण आढळले असून त्यापैकी 450 रुग्ण बरे झाले आहेत. तर 71 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 524 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागात आतापर्यंत 426 रुग्ण आढळले असून त्यापैकी 147 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 271 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान रविवारी आढळलेल्या 209 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1 हजार 471 वर पोहोचला असून त्यापैकी 597 रुग्ण बरे झाले आहेत. तर 79 रुग्णांचा मृत्यू झाला असून 795 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. याबाबत पालिका प्रशासनाच्याविरोधात लोकप्रतिनिधी व नागरीकांमधून आरोप केले जात होते. पालिका प्रारशासनावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने महानगरपालिका आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी केली होती.
त्याची राज्य शासनाने दखल घेऊन शनिवारी विद्यमान पालिका आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांची भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन उचलबांगडी करुन त्यांच्या जागेवर नाशिक उपजिल्हाधिकरी तथा कळवण येथील प्रकल्प अधिकारी डॉ.पंकज आसिया यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त आसिया यांनी शनिवारीच पदभार स्वीकारला असून ते भिवंडीत कोरोनाला रोखण्यासाठी मालेगाव महापालिकेत त्यांनी राबविलेल्या उपाययोजना इथेही राबविणार असल्याचे सांगण्यात आले.