ठाणे - डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेल्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात आमदार जगन्नाथ तथा अप्पा शिंदे यांच्या हस्ते मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. सोबतच डोंबिवली शहरातील वाहतूक पोलीस, महापालिका कर्मचारी, पत्रकार, सफाई कामगार आणि पोलीस ठाण्यातील आरोपींनाही या साहित्याचे विनामूल्य वितरण करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य तितक्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरात २ हजार मास्क आणि तितक्याच सॅनिटायझरच्या बाटल्या, असे जवळपास २ लाख रुपयांचे साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे दिलीप देशमुख, विलास शिरुडे, राजेश कोरपे, निलेश वाणी, लीना विचारे, यग्नेश मेहता यांसह केमिस्ट मंडळी उपस्थित होती.
हेही वाचा - गुढी पाडव्याला दिसणार नाही बाजारात आंबा...
या उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रवीण पवार आणि नीतीन आहेर यांचे सहकार्य लाभले. डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयातील कर्मचारी, पोलिसांनाही रांगेत उभे राहून मास्क आणि सॅनिटायझर वितरित करण्यात आले. तर, डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींनाही मास्क आणि सॅनिटायझर वितरित करण्यात आले.
हेही वाचा - एअरहोस्टेस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची धक्कादायक कबुली...