ठाणे - एका भंगार दुकानातील लोखंडी खुर्चीवर बसताच विजेचा शॉक लागून एका १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प ३ येथील पंजाबी कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. शफिउल्ला शहा, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
खुर्चीच्या खाली विद्युत वायर दबल्याने घडली घटना : मृतक शफिउल्ला हा आज (रविवारी) दुपारच्या सुमारास त्याच्या भंगारच्या दुकानातील लोखंडी खुर्चीवर बसला असता अचानक विजेचा शॉक लागला आणि तो खाली पडला. तत्काळ त्याला उपचारासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. शफिउल्ला यांचे उल्हासनगरमधील पंजाबी कॉलनी परिसरात भंगारचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे तो दुकानात गेला. परंतु लोखंडी खुर्चीच्या खाली वायर दबल्याने कट होऊन शॉर्टसर्किट झाल्यामुळे त्याचा संपर्क लोखंडी खुर्चीशी आला आणि विजेचा शॉक लागल्याचे बोलले जात आहे. आता या घटनेनंतर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - Satara Crime News : साताऱ्यात बालिकेचे अपहरण करुन अत्याचार करणारा नराधम गजाआड