ठाणे: कळवा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला ४८ तास उलटत नाही तोच शनिवारी रात्री साडेदहा ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 'आयसीयू' मधील १३ तर जनरल वॉर्ड मधील १४ रुग्णांचा समावेश आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या कारभाराचे पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम झाले आहे. कळवा हॉस्पिटल रुग्णांनी ओव्हरपॅक झाले असून तीनशे रुग्णांचा तुटवडा आहे. या हॉस्पिटलची क्षमता पाचशे रुग्ण एवढी असतानाही ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले सहाशे रुग्ण अक्षरशः कोंबून भरले आहेत. डॉक्टरांची अपुरी संख्या, आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे या रुग्णालयावर कमालीचा ताण पडत आहे.
कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण: ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेवर सध्या नवी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल मनोरुग्णालयाच्या जागेत हलवले आहे; मात्र याची माहिती ग्रामीण भागातील रहिवाशांना नसल्यामुळे केवळ ठाणे शहरच नव्हे तर पालघर, जव्हार, वाडा, मोखाडा, शहापूर, मुरबाड अशा विविध भागातून रुग्ण मोठ्या संख्येने रोज ठाणे महानगरपालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये येत आहेत. त्यामुळे येथील डॉक्टरांवर तसेच नर्सेस आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
अश्रू.. हुंदके आणि टाहो: कळवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली असून शनिवारी एकाच रात्रीमध्ये 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच घसरली. 'आयसीयू'मध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 13 रुग्ण दगावले असून त्या विभागात आता फक्त 4 रुग्ण उरले आहेत. एकापाठोपाठ रुग्ण दगावल्याचे जाहीर होत असतानाच रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांच्या अश्रूंचा पूर वाहत होता. उपचार सुरू असताना अचानक रुग्ण कसा दगावला हेच कुणाला समजत नव्हते. घटनास्थळी अतिशय करुण दृश्य असून कुणाची आई, कुणाचे वडील तर कुणाची बहीण दगावल्याने संपूर्ण कळवा हॉस्पिटलवर दुःखाची छाया पसरली आहे. रुग्णालयाच्या परिसरात आता फक्त अश्रू, हुंदके आणि टाहो ऐकू येत आहेत.
रात्री बारा वाजता ऍडमिट केले; पहाटे चारला मृत्यू: अल्सर असलेल्या एका महिलेला रात्री बारा वाजता कळवा हॉस्पिटलमध्ये तिच्या भावाने ऍडमिट केले. तातडीने ऑपरेशन करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितल्याने हे ऑपरेशन देखील केले. त्यानंतर या महिलेला आयसीयूमध्ये आणले; मात्र काही तासातच म्हणजे पहाटे चार वाजता या महिलेचा मृत्यू झाला. सर्वांत धक्कादायक म्हणजे, दुपारी बारा वाजेपर्यंत तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला गेला नाही. त्यामुळे कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. कागदपत्रांची पूर्तता करण्यास उशीर होत असल्याचे सांगून मृत महिलेच्या नातेवाईकांना प्रचंड वेदना झाल्या.
शिवसैनिक आक्रमक; डीनला विचारला जाब: कळवा हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणामुळे 17 जणांचा मृत्यू झाल्याचे समजतात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी डीन अनिरुद्ध माळेगावकर यांना घेराव घातला तसेच त्यांना जाब विचारला. या बेफिकिरी विरोधात शिवसैनिकांनी घोषणा देत संपूर्ण कळवा हॉस्पिटल दणाणून सोडले. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळेच एकाच रात्री हे मृत्यू झाले. हॉस्पिटल ओव्हरलोड झाले असेल तर तुम्ही मुख्यमंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांना लेखी का कळवले नाही, असा सवाल केदार दिघे यांनी केला.
दीपक केसरकर: रुग्णालयातील 18 जणांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती उद्यापासूनच त्यांच्या कामाला सुरुवात करेल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या प्रकरणी काही तांत्रिक बाबी आहेत. त्या तपासल्या जातील. चौकशीत हे मृत्यू नैसर्गिक आढळले तर कोणत्याही प्रकारची भरपाई दिली जाणार नाही; मात्र हे मृत्यू निष्काळजीपणामुळे झाल्याचे सिद्ध झाल्यास नक्कीच रुग्णांच्या नातेवाईकांना त्याबाबत भरपाई दिली जाईल. त्याचप्रमाणे दोषींवर कारवाई देखील होईल, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले.
हेही वाचा: