मुंबई - हिंदी आणि मराठी सिनेमातून आपल्या प्रतिभेची मोहर उमटवलेले दिग्दर्शक राजेश मापुस्कर एक नवाकोरा सिनेमा घेऊन येत आहेत. ‘एप्रिल मे ९९’ असं हटके शीर्षक असलेला हा सिनेमा मापुस्कर बंधू बनवत आहेत. विशेष म्हणजे याचं दिग्दर्शन रोहन मापुस्कार करणार असून हा त्यांचा दिग्दर्शन पदार्पणाचा चित्रपट असणार आहे. या सिनेमातून फिल्म कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव असलेले रोहन मापुस्कर एका नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.
राजेश मापुस्कर यांनी आशयपूर्ण चित्रपटांचं दिग्दर्शन करुन आपली या क्षेत्रातील कामगिरी सिद्ध केली आहे. बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'थ्री इडियट' या चित्रपटासाठी काम केलं होतं. त्यांनंतर 2012 मध्ये त्यांनी 'फेरारी की सवारी' हा अफलातून चित्रपट बनवला. उत्तम कथानक, जबरदस्त स्टारकास्ट आणि तंत्राज्ञांची तगडी टीम यासह बनलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि राजेश मापुस्कर हे नाव सर्वश्रृत झालं. त्यानंतर त्यांनी एक मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला 'व्हेन्टीलेटर' हा सिनेमा मापुस्करांच्या कारकिर्दीतला सर्वात महत्त्वाचा चित्रपट ठरला. नंतर या चित्रपटाचा गुजराती भाषेतही रिमेक झाला. अलीकडे त्यांनी दिग्दर्शित केलेला 'येक नंबर' हा चित्रपटही लक्षवेधी ठरला होता.
तर दिग्दर्शनातलं मोठं नाव असलेले राजेश मापुस्कर आणि फिल्म कास्टिंगमधील मोठं नाव असलेले त्यांचे बंधू रोहन मापुस्कर एकत्र आले असून त्यांचा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रदर्शित होणार आहे. राजेश मापुस्करांनी नेहमीच चांगल्या कथानकाची निवड केली आहे. यातला पात्रांच्या निवडीसाठीही ते नेहमी सतक्र असताना आणि खरीखुरी पात्रं साकारतात. पुन्हा एकदा त्यांच्या या हातखंडाचा अनुभव या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांना मिळू शकतो. मापुस्कर ब्रदर्सच्या या चित्रपटाचं कथानक, स्टारकास्ट आणि इतर बऱ्याच गोष्टी गुलदसत्यात आहेत. मात्र, येणारा सुट्टीचा हंगाम मनोरंजक ठरेल अशी आशा प्रेक्षकांनी बाळगायला हरकत नाही.