नवी मुंबई - शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. आज (बुधवारी) एका दिवसात नव्या 156 कोरोनाग्रस्त रुग्णांची नवी मुंबईमध्ये वाढ झाली आहे. तर आज 67 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आज 5 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांची नवी मुंबईत झपाट्याने होत असलेली वाढ प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्रं नवी मुंबईत दिसून येत आहे.
कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली असून, बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या मात्र कमी होत असल्याचे चित्र नवी मुंबई शहरात दिसून आले आहे. वाढते रूग्ण रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. मात्र, त्यात फारसे यश येत नसल्यानेचेही दिसून येत आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या रूग्णांसाठी रुग्णालय देखील कमी पडत आहेत. त्यामुळे वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 1 हजार 100 बेडचं तात्पुरत कोविड रूग्णांलय उभारण्यात येत आहे. मात्र, हे रुग्णालय उपचारासाठी कधी खुल केलं जाईल याची प्रतीक्षा सर्व स्तरात आहे.
आत्तापर्यंत 3230 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. शहरात 13980 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 10370 जण निगेटीव्ह आले असून, 390 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 219 इतकी आहे, आज 156 जण (10 जून ) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तुर्भेमधील 40, बेलापूरमधील 8, कोपरखैरणेमधील 15, नेरुळमधील 24 व वाशीतील 16, घणसोलीमधील 15, ऐरोलीमधील 32, दिघा 6 असे एकूण 156 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 61 स्त्रिया व 95 पुरुषांचा समावेश आहे.
शहरात 3 हजार 219 इतका कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 1 हजार 915 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर आज बेलापूरमधील 1, नेरूळ मधील 6, वाशीमधील 5, तुर्भेमधील 26, कोपरखैरणेमधील 13, ऐरोलीमधील 12, दिघा 4 अशा एकूण 67 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये 25 स्त्रिया आणि 42 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थिती मध्ये 1 हजार 203 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.