ठाणे - शहरात विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कळवा, मुंब्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. शहरातील दोन प्रभाग समिती वगळल्या तर प्रत्येक प्रभाग समितीत कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, असे 15 विभाग पालिकेने कंटेनमेंट झोन (बाधीत क्षेत्र) म्हणून जाहीर केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून पालिकेने हे पाऊल उचलले आहे.
ठाणे शहरामध्ये काजूवाडी, दोस्ती विहार, हॅप्पी व्हॅली मानपाडा, साईबाबानगर कळवा, लोढा पॅराडाइज माजीवडा, रुणवाल गार्डन, धोबीआळी, कौसा अमृतनगर येथील विघ्नहर्ता इमारत, कळवा मनिषानगर, एमजी रोड नौपाडा, वृंदावन सोसायटी आणि विटावा सूर्यानगर ही 15 ठिकाणे कंटनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या क्षेत्रामध्ये बाहेरील कोणी जाऊ शकणार नसून, आतीलही कोणी बाहेर जाऊ शकणार नाही.
आतमध्ये असलेल्या नागरीकांना अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची हमी देखील देण्यात आली आहे. एका रुग्णामुळे इतर नागरीकांचे हाल होत असले तरी शेकडोंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पालिकेने हे पाऊल उचलले आहे. या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यातही कळव्यात सर्वाधिक म्हणजे 10 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंब्य्रातील अमृत नगर भागात आत्तापर्यंत 4 रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेच्या वागळे आणि दिवा प्रभाग समिती वगळता इतर सात प्रभाग समित्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत.
दिव्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी येथील नागरीकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच येथील रहिवाश्यांसाठी देखील घरपोहच किराणा आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रभाग समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. या भागातील नागरीकांसाठी इतर सोई सुविधाही पुरवल्या जात आहेत. नागरीकांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे पालिकेने आवाहन केले आहे.
प्रभाग समिती कोरोना रुग्ण
1) माजिवडा मानपाडा 05
2) वर्तकनगर 01
3) लोकमान्य सावरकरनगर 02
4) नौपाडा 03
5)उथळसर 01
6) वागळे 00
7) कळवा 10
8) मुंब्रा 04
9) दिवा 00