ठाणे - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर खासगी संस्थेमार्फत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला १० अत्याधुनिक मोफत व्हेंटिलेटर मशीन्स मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हे अत्याधुनिक व्हेंटिलेटर महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच चालले असून गुरुवारी या रुग्णांनी १०० चा आकडा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात कोरोना रुग्णांसाठी महापालिकेला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते. या विचारातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कृष्णा डायग्नोस्टिकमार्फत हे १० अत्याधुनिक व्हेंटिलेटर महापालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. अमेरिकन बनावटीचे हे अत्याधुनिक व्हेंटिलेटर असून कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच या पोर्टेबल व्हेंटिलेटरमुळे एखाद्या रुग्णाला एका रुग्णालयातून दुसरीकडे हलवण्यात कोणताही अडथळा येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, कल्याण आयएमएचे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील, माजी महापौर राजेंद्र देवळेकर आणि तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या व्हेंटिलेटरची चाचपणीही करण्यात आली. ज्यामध्ये आताच्या घडीला हे व्हेंटिलेटर केडीएमसीच्या आणि गरज भासल्यास रुग्णांच्या दृष्टीनेही उपयुक्त असल्याचे तज्ञ डॉक्टरांकडून यावेळी सांगण्यात आले. कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
तर, कल्याण-डोंबिवलीतील वाढती रुग्णसंख्या ही संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची आहे. महापालिका घरोघरी जाऊन अशा व्यक्तींचे नमुने घेतले असल्याने आकडे वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहण्याचे आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.