सोलापूर- प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा सोलापुरातील शहर युवक काँग्रेसने निषेध केला आहे. सोलापुरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी दहन केले आहे.
लखनऊ येथील निदर्शनावेळी निवृत्त आयपीएस अधिकारी दारापुरी यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी चालल्या होत्या. मात्र, वाटेत उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्याला अडवून धक्काबुक्की केली, असा प्रियांका गांधींनी आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करण्याच्या इराद्याने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते. ऐनवेळी पोलिसांनी या पुतळा दहनास मज्जाव करत पुतळा हिसकावून नेला. त्यामुळे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिमेचे दहन करत जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या.
आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन करून का होईना पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारचा निषेध केला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, सो.म.पा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- सोलापुरात रस्त्याच्या मागणीसाठी अवतरले चक्क यमराज, संभाजी ब्रिगेडचे आंदोलन