सोलापूर - कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असले तरी ग्रामीण भागातील लोकांमध्ये मात्र कोरोना हा चेष्टेचा विषय झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील लोक कोरोनाच्या संदर्भात काळजी घेताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत पंढरपूर तालूक्यातील करकंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे.

पंढरपूर तालूक्यातील करकंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी आणि संशयीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कोरोनाच्या संदर्भात जनजागृती करणारा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. आम्ही तूमच्यासाठी येथे थांबलो आहोत. तूम्ही आमच्यासाठी आणि इतरांसाठी घरीच थांबा, असा फलक हातात घेऊन घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे.
आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हे पाऊल उचलले आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना संदर्भात गांभीर्याने पाहिले जात नाही. कोरोना हा टिंगल टवाळीचा विषय झालेला असताना प्राथमिक आरोग्य केंद्राने उचललेले हे पाऊल जनजागृतीसाठी महत्वाचे आहे.